आम्ही अनुभवलेले प्रा. यशवंत सुमत
सन २००५ ते २००७ दरम्यानचा काळ असेल. मी कोल्हापूकरच्या शिवाजी
विद्यापीठात एम. ए. करीत होते. विभागप्रमुख डॉ. अशोक चौसाळकर यांच्या जबरदस्त व्यासंगाचा अनुभव घेत होतो. त्यांच्या ज्ञान सागरात
साक्षात मुक्तपणे डुंबत होतो. पण, विद्यार्थ्यांना नवेनवे विषय कळावेत. नव्या विचार
प्रवाहांची माहिती व्हावी. अभ्यासकांनी मुलांशी बोलावे, असा चौसाळकर सरांचा नेहमीचा
आग्रह असायचा. या आग्रहातूनच डॉ. यशवंत सुमंत सरांना पहिल्यांदा भेटायचा योग आला आणि
अफाट व्यासंग असलेल्या माणसाच्या प्रेमात पडलो. यापूर्वी मी कवठेमहांकाळ येथे २००३-२००४
दरम्यान बी. ए. करीत असताना शिवाजी विद्यापीठाच्या गांधी अभ्यास केंद्राच्या वतीने
महात्मा गांधी यांच्या संबधी एका परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी संजय संगवई, सुमंत
सर आणि चौसाळकर सरांना पहिल्यादा पाहिले आणि ऐकले होते. पण, त्यावेळी ते काय बोलतात
हे डोक्यावरून जात होते. काहीच समजत नव्हते. त्यावेळी माझ्यावर संगवई यांचा प्रभाव
पडला होता. एम. ए. करीत असतानाही डॉ. चौसाळकर गांधी अध्यासनाचे अध्यक्ष होते. त्यांच्याच
प्रयत्नातून पुन्हा एकदा संजय संगवई आणि सुमंत सरांना भेटता आले. आणि माझ्या अल्प ज्ञानाच्या
जोरावर मी त्यांच्याशी वादही घालत गेलो. कदाचित या वाद घालण्याच्या सातत्यामुळेच मला
संगवई आणि सुमंत सरांनी पत्रकारिता करण्याचा सल्ला दिला असावा. संगवई सरांचा फारसा
सहवास लाभू शकला नाही. ‘सर तुमची तब्बेत बरी नाही का,’ असे मी विचारताच त्यांचे नेहमीचे
आणि ठरलेले एक उत्तर असायचे ‘आता बरी आहे, बाबा.’
सुमंत सर मात्र, धडधाकट
आणि खणखणीत असायचे विद्यापीठात आलेल्या पाहुण्या प्राध्यपाकांना ने-आण करण्याचे काम
बहुतेक वेळा चौसाळकर सर मला सागायचे. त्यातूनच डॉ. सुमंत आणि डॉ. शैलेंद्र देवळाणकर
यांच्याशी चांगले संबध निर्माण झाले होते. सुमंत सर पाच-सहा दिवस गेस्ट लेक्चरसाठी
शिवाजी विद्यापीठात येत असत. त्यावेळी त्यांच्याशी बोलण्याची आणि काही वेळ त्यांच्याबरोबर
घालवण्याची संधी मिळत गेली. त्यांच्या शिकवण्याचा एक अनुभव मी येथे नमूद करतो. सुमंत
सर अकराच्या दरम्यान क्लास सुरू करायचे दुपारी साडेबारा एकच्या सुमारास चहा, बिस्किट
यायचा. सरही चहा बिस्किट आमच्याबरोबर घ्यायचे. चहा संपताच पुन्हा लेक्चर सुरू
व्हायचे ते थेट अडीचपर्यंत म्हणजे सुमंत सर सलग तीन-साडेतीन तास शिकवायचे आणि ४५ मिनिटांच्या
तासाला वळवळ करणारी मुलही शांतपणे सरांना ऐकायचे. कारण, सुमंत सर आंबेडकर, गांधी, सावरकर,
मार्क्स, नेहरू आमच्यासमोर उभे करायचे. आमच्याशी हे विचारवंत बोलताहेत अशीच ती आवस्था
असायची. आम्ही गुंग होऊन जायचे. डोक्याला इतका जड खुराक झाल्यानंतरही पुन्हा सायंकाळी
त्यांच्याबरोबर गप्पा मारायला जायचो. कधी-कधी चौसाळकर सर म्हणायचे, सरांना जरा आराम
करू द्या, तुमच्या गप्पा लवकर संपवा. तरीही या गंभीर वैचारीक गप्पा लाबतच जायच्या.
आज पत्रकारितेत आहे म्हणून म्हणा किंवा अन्य एखाद्या ठिकाणी असतो तरीही समाजातील घटनांचा
अर्थ लावण्याची जी धडपड करतोय, धाडस करतोय त्याचे सर्व श्रेय सुमंत सर, चौसाळकर सर
आणि देवळाणकर सरांनाच जाते.
No comments:
Post a Comment