मराठी साहित्यातील चाकोरी सोडून वेग
विषय हाताळणारी, एक ‘बोल्ड कवयित्री’, अशी स्वाती शिंदे-पवार यांची ओळख आहे.
स्त्रीकोष, वाटेवरती काचा गं, मास्तरकी अंधारात मठ्ठ काळा बैल, माती मोकळी
होताना, काळजीसाठी काही ओळी, वेदनेच्या
खोल तळाशी आणि प्रेम म्हणजे प्रेमच, असे सात कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत.
मराठी कवितेला घरदार-कुटुंबाच्या पुढे घेऊन जाणारी अन् स्त्रीला बंडखोरी करायला
लावणाऱ्या या कवयित्रीने मराठी साहित्यात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांच्या
साहित्यिक प्रवासाविषयी...
........
प्रश्न- तुमच्या कविता लिखाणाला
सुरुवात कशी झाली. कवितांमागील मूळ प्रेरणा काय आहे?
- सातवीत असताना पहिल्यांदा कविता
केली. उन्हाळ्यात आई पापड करीत होती. वाळत टाकलेले पापड कावळा उचलत असल्याने मला
पापड राखायला बसविले होते. पण, माझे लक्ष कावळ्याकडे नव्हते, मी कावळा आणि पापडावर
कविता लिहित बसले होते. कावळ्याने बरेच पापड उचलून नेले. तरीही माझे त्याकडे लक्ष
नव्हते. शेवटी आईने येऊन पाठीत दोन रपाटे मारले अन् मी भानावर आले. ती कविता होती,
एक आला कावळा
त्याला पापड दिसला
मी एक दगड मारला
कावळा भुरुकन उडून गेला. या
कवितेपासून माझ्या कावितेची सुरुवात झाली. पण रुढ अर्थाने कविता लिहिण्यास बऱ्याच
उशिराने सुरूवात केली. दहावीत शाळेत अभ्यासिका होती. शिक्षक तेच-तेच पुन्हा
वाचायला लावीत. त्याचा कंटाळा येई, म्हणून मी शिक्षकांपासून चोरून कथा-गोष्टींची पुस्तके
वाचत असे. एखादा शिक्षकांनी ते बघितले. शिक्षक म्हणाले, साहित्याचा नाद आहे, तर तू
चांगला निंबध लिहिशील. त्यांनी एका निंबध स्पर्धेत मला भाग घ्यायला लावला. दहावीतच
वर्गातच मी चिमणीवर एक कविता लिहिली. ती कविता मी पुढे डीएड करीत असताना
पुण्याच्या ‘दै. संध्या’मध्ये छापून आली. पुढे संध्यासह अनेक साहित्यिक
मासिकांमधून माझ्या कविता छापून आल्या. अन् मी कविता करू शकते याचा विश्वास
निर्माण झाला.
पण, कविता करण्यामागचा माझा उद्देश
वेगळाच होता. मी पाचवीपासून एमएच्या दुसऱ्या वर्षांपर्यंत वक्तृत्व स्पर्धेत भाग
घेत असे. सातवीपासून व्याख्याने देणे सुरू केले. डीएडनंतर व्याख्यानांसाठी मागणी
वाढली, याच दरम्यान मी सूत्रसंचलन सुरू केले. सामाजिक विषयांवर बोलत गेले.
त्यामुळे राज्यभरात पाचशेहून अधिक स्पर्धा जिंकल्या आहेत. या स्पर्धेतील भाषणात
अधूम-मधून वापरण्यासाठी काही कविता लागत, म्हणून मी कविता करायला सुरूवात केली.
ज्यावेळी माझा वक्तृत्व स्पर्धेतील सहभाग कमी झाला. व्याख्याने देणे कमी झाले
तेव्हा मी रुढ अर्थाने कविता लिहिणे सुरू केले. बहुतेक कविता मी प्रवासात असताना
लिहिल्या आहेत.
प्रश्न- इतर कवयित्रींच्या तुलनेत
तुम्ही वेगळे विषय हाताळाले आहेत. नेहमीची चाकोरी सोडून तुम्ही कविता केल्या आहेत,
तुम्ही स्त्रीयांना बंडखोरी करायला प्रोत्साहीत करता, हा बदल कसा झाला?
-तुम्ही एखांद्या कवयित्रीच्या
कवितेकडे स्त्रीने लिहलेली कविता, या दृष्टीकोणातून बघता त्यावेळी. तुम्हाला
माझ्या कवितांमध्ये काहीतरी वेगळे वाटेत. पण, माझ्या कवितांकडे त्या दृष्टीकोणातून
बघू नका. कारण, मी लिंगातीत जगले आहे. माझं जगणं स्त्री-पुरुष भेदापलिकडे आहे.
लहानपणापासून व्याख्याने, स्पर्धांसाठी जवळपास पूर्ण महाराष्ट्र फिरले आहे.
त्यामुळे मला सामाजिक भान लवकर आले. मी नवरा, बायको, कुटुंबावर कविता केल्या आहेत.
माझ्या कविता सहज आहेत. मला असे करायचे म्हणून मुद्दामहून मी काहीच केले नाही. त्यामुळे,
वाटेवरती काचा गं
हळूच त्या वेचा गं
किती दिवस जगायचे
सुळावरचे जिणे हे
आता पदर खोचा गं
बेड्या साऱ्या तोडूया
स्वातंत्र्याला जोडूया
स्वच्छंदी आता नाचा गं, असा
बंडखोरपणा माझ्या कवितेत दिसतो.
मुलगीच नसेल घरी
अंगणी कोण मांडेल डाव?
तुझ्या काळजाच्या जखमेचा
बुजवील कोण घाव?, ही स्त्रीभ्रूण हत्येवरील
कविताही आहे.
घराणेशाही विरुद्धही माझ्या काही
कविता आहेत.
प्रश्न- तुम्ही प्राथमिक शाळेत
शिक्षिका आहात. तुमचा शिक्षकांवरील कवितांचा संग्रह प्रकाशित आहे, त्याविषयी काय
सांगाल?
- मूळात शिक्षकांसमोरील अडचणी मोठ्या
आहेत. त्यांना मूळ काम सोडून इतर कामेच करावे लागतात. त्यातून
खरे नाही काही
गरिबाच्या मुला
शासन-निर्णय
बाद केले तुला, अशी कविता लिहिली आहे.
सरकारच्या योजनांनी मास्तरांची
ससेहोलपट होत आहे. त्यावरील माझी कविता अशी आहे,
सर्व शिक्षा अभियान
तुला लागो माझा शाप
कागदाच्या घोटाळ्यात
लागे मास्तरास फास.
शिक्षणबाह्य कामांमुळे मुलांचे भविष्य
उध्वस्त झाले आहे, त्यावरील कविता अशी,
जनगणना केली संडास-मुताऱ्या पाहिल्या
कुत्री मोजली सर्वेक्षण केले
निरक्षरांना शिकऊन झाले
साक्षरांना टिकऊन झाले
आतातरी थोडे शहाणे होऊन पाहूया.
एकूणच शाळेत आता राम राहिला नाही,
त्या अस्वस्थतेतू माझी
गुरुजी तुमचा श्याम आता
श्याम राहिला नाही
अन् तुमच्या शिक्षणातही
आता राम राहिला नाही, अशी कविता निर्माण
झाली आहे.
प्रश्न- तुमच्या कवितांमध्ये फारसा शृंगार,
निसर्ग सौंदर्य आणि विद्रोह दिसत नाही. जातीअंतावरील कविताही तुम्ही फारशा
केलेल्या दिसत नाहीत?
-माझा पिंड बंडखोरपणाचा, विद्रोहाचा आहे. मला जातीअंतावर लिहायचे आहे, तशी एक
कविता लिहिली आहे ती अशी,
आमच्या कपाळावर डिंकवलेली जात
जर कशानं जात असती
तर आम्ही सारे उपाय केले असते
वेशीवर आणि गावकुसाबाहेर
अश्रू ढाळण्याचे शल्य
दूर सारता आले असते.
पुरोगामी किंवा सुधारणावादी कविताही
मला करायच्या आहेत, तुक्या नावाची माझी कविता अशी आहे,
आज इंद्रायणी हिंदकळते
डोह गढूळतो
काठ्या डोचविणारा मंबाजी
तिथे उभा ठाकतो
तुक्या तुझं पुष्पक घेऊन
एकदा देहूत येऊन जा
इथे माडलेत मंबाजीच मंबाजी
त्यांच्याकडे थोडं पाहून जा.
शृंगार, निसर्ग सौंदर्य माझ्या कवितांमध्ये
फारसे दिसत नाही. माझ्या कवितांमध्ये पावसाचे वर्णन नाही. शृगाराच्या अगांने
जाणाऱ्या कविताही नाहीत. याचे कारण, माझ्या स्वभावात आहे. मूळात मी चाकोरी धरून कधी
जगले नाही. मी लहानपणापासून स्त्री म्हणून जगले नाही. लहान मुलींना जसे भातुकलीचे
खेळ आवडतात तसे बाईपणाचा कोणताही खेळ मला कधीच आवडला नाही. लहानपणासून आजपर्यंत
कधीच पावसात भिजावे वाटले नाही. फक्त रात्रीचा चंद्र पाहणे आवडतो, चंद्रावर माझ्या
काही कविता आहेत. निसर्गावरील काविताही मी फारशा केलेल्या नाहीत, हे खरेच आहे.
प्रश्न- महाराष्ट्रातील एक बोल्ड
कवयित्री, अशी तुमची ओळख आहे. तुम्ही स्वताः शिंदे-सरकार घराण्यातील, खेड्यातील आहात
तरीही अशा कविता कशा केल्या? या प्रकारच्या कविता करताना घरातून विरोध झाला नाही का?
-माझ्या कविता बोल्ड असण्यापेक्षा अधिक
स्पष्ट आहेत. माझा जन्म सरकार घराण्यात झाला. आमच्या घरच्या बायकाने ‘परकाळा’
घेतला. चपला काखेत घेतल्या. माझी चुलती इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका
असतानाही ती ‘परकाळा’ घेत होती. माझ्या आईच्या पिढीने ते केले. माझ्या पिढीला ते
पटले नाही. मूळात माझ्यात आलेले धाडस खूप कष्टाने आले आहे. मी पहिल्यांदा सातवीत
असताना २६ जानेवारीनिमित्त गावातील व्यासपीठावर भाषण केले. शिदे सरकारांच्या
घरातल्या मुलीने भाषण केले म्हणून गावात
चर्चा झाली. या चर्चेमुळे माझे वडील दोन दिवस जेवले नाहीत. आईही जेवली नाही. मी
लहान असतानाही त्यांच्याशी वाद घातला, तुम्ही सरकार आहात. तुम्ही गावच्या
व्यासपीठावरून कायम बोलता. तुम्ही गावातील मुलं-मुलींची भाषणे ऐकता. त्यांचे कौतुक
करता. बक्षीस देता. मग मी केलेल्या भाषणाचे कौतुक करणे सोडून माझ्यावर राग का? माझ्या या धीट बोलण्याचा
परिणाम काय झाला माहीत नाही. पण, वडिलांनी सांगितले, आजपासून तू भाषणं कर वक्वृत्व
स्पर्धांमधून भागही घे. या घटनेपासून मी व्यासपीठावर बोलणे सुरू केले.
कविता करतानाचा प्रसंगही असाच
धक्कादायक आहे. सातवीत असल्यापासून कविता लिहिण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या
कविता आजच्या रुढ अर्थाने कविता नसतीलही पण, मी लिहित होते. मी कविता चोरुन लिहायची.
कवितेची वही गादीखाली ठेवत असे. एक दिवस आईने ते बघितले. आई वाचत असताना वडील आले,
आईने वही लपविली पण, वडिलांनी ते बघितले वही काढून वाचली. आपली मुलगी असे काहीतरी वेगळे
लिहित आहे, हे बघून पुन्हा ते एक दिवस जेवले नाहीत. मलाही चार दिवस नीट जेवण
मिळाले नाही. मात्र, डीएडसाठी पहिल्यांदा घराबाहेर पडले, मला मोकळीक मिळाली.
लग्नानंतरही मला मोकळीक मिळाली. मी अधिक बोल्ड झाले, असे म्हणण्यापेक्षा अधिक
स्पष्ट झाले, मोकळी झाली.
त्यातून,
तुझ्या साखरचुंबनांना
मर्यादा हवी होती
तशी वागण्याची पद्धत
मला नवी होती
अलगद चुंबता चुंबता
वर्षाव करीत गेलास
वक्षावरून ओघळत कधी
ओष्ठ्यमृत पित गेलास
आणि
खाव्या वाटतात चिंचा
गाभुळल्या दिसांच्या
गुंफाव्या वाटतात बटा
विस्कटल्या केसांच्या
शबरीनं द्यावीत रामाला
तशी उष्टी बोरं
तुझ्या मागे फिरणारी
दामात काढावीत पोरं, अशा कविता अशा
शब्दबद्ध झाल्या आहेत.
प्रश्न-तुम्ही महाराष्ट्रभर फिरला
आहात. एक महिला साहित्यिक म्हणून तुमचा अनुभव कसा आहे काही इतर साहित्य प्रकार
हाताळत आहात काय?
- राज्यभरात फिरल्यामुळे महाराष्ट्र
काय आहे, हे मला लवकर कळले. माणसं ओळखता, वाचता येऊ लागली. मला मिळालेल्या वागणुकीविषयी मी नक्कीच
समाधानी आहे. ‘ये माझ्या आबा,’ ही दिवगंत आर. आर. पाटील यांच्यावरील कविता माझी आहे. पण, ती कविता अनेकांच्या
नावावर व्हॉटस् अॅपवरून फिरत आहे. या कवितेची अनेक माध्यमांनी दखल घेतली आहे.
माझ्या कवितेत गेयता फारशी नाही, हे मान्य. पण, गेयता कमी असल्याचा
काही तोटा झाल्याचे जाणवत नाही.
कवितांचे सात संग्रह प्रकाशित झाले
आहेत. पण, मला ललित लेखन, कथा, कादंबरी हे विषय मला हाताळलेचे आहेत. मी सध्या ललित लेखन, काही कथा केल्या
आहेत. पण, कादंबरी लिहिण्यासाठी लागणारा वेळ माझ्याकडे नाही. त्यासाठी जी बैठक बसली
पाहिजे. तशी बैठक बसत नाही. पण मला कांदबरी हा साहित्यप्रकार दमदारपणे हाताळचा
आहे.
प्रश्न- तुम्ही अक्षरयात्री
प्रतिष्ठानच्या माध्यामातून ग्रामीण भागात साहित्य चळवळ सुरू केली आहे. मागील सतरा
वर्षांपासून तुम्ही विट्यात अक्षरयात्री ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित करता
आहात, हा अनुभव कसा आहे?
-अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या
माध्यमातून ग्रामीण भागातील नवख्या साहित्यिकांना लिहिण्यासाठी मदत केली जाते.
कविता-कथा कशा लिहिल्या जाव्यात, याचे मार्गदर्शन केले जाते. माझ्या मुलीच्या
वाढदिवसानिमित्त विट्यात (जि. सांगली) अक्षरयात्री ग्रामीण मराठी साहित्य संमेलन
आयोजित करते. या संमेलनाची अध्यक्षा महिला असते. उद्घाटक महिला असते. विविध परिसवांदाचे अध्यक्षही महिला असतात. लहान मुलांमध्ये
साहित्यविषयक आवड निर्माण व्हावी, यासाठी काही ‘सीडी’ तयार केल्या आहेत.
….
दत्ता जाधव
dattatray.jadhav1@timesgroup.com

No comments:
Post a Comment